रेल्वे प्रवाशांना लुटणारा बोगस तिकीट चेकर जेरबंद, दौंड लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

अख्तर काझी

दौंड : तिकीट तपासणी असल्याचे सांगून रेल्वे प्रवाशांची फसवणूक करीत आर्थिक लूट करणाऱ्या परप्रांतीय तोतया तिकीट तपासणीसास दौंड लोहमार्ग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (लोहमार्ग) पथकाने दौंड येथील कॉर्ड लाईन रेल्वे स्थानकात अटक केली.

दिनानाथ शिवशंकर साह (वय 33,रा. सुगंधा थळी, डेक्कन जिमखाना, मनपा, पुणे. मूळ रा.पोटे याहट,जि. गोंडा, झारखंड) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 204, 318 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.8 सप्टेंबर रोजी दानापूर-पुणे एक्सप्रेस गाडीने प्रवास करणारे रफिक राईन यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली की, सदर गाडीमध्ये एक व्यक्ती प्रवाशांना आपण तिकीट तपासणीस असल्याचे सांगत आहे परंतु तो तिकीट तपासणीस वाटत नाही असा संशय येत आहे.

खबर मिळताच लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशाने दिलेल्या माहितीवरून लागलीच लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश दबडे, पो.हवा.रुपेश साळुंखे, पो. हवा. मनोज साळवे, पो. कॉ. सचिन खंडागळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा दौंड युनिटचे पो.हवा.आनंद वाघमारे, पो.क. नरेंद्र पवार या पथकाने दानापूर-पुणे एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाईन स्थानकावर येताच संशयित आरोपीचा शोध घेतला व तोतया तिकीट तपासणीस दीनानाथ शिवशंकर साह याला जेरबंद केले.

पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) तुषार दोशी, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.