मुंबई : सहकारनामा
राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली की काय याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. हे सर्व सुरू असतानाच आता पुन्हा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः याबाबत ट्वीटरवरून माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुरुवारी एका दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 मोठ्या नेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली की काय असा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. अगोदर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली नंतर त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे मोठे नेते एकनाथ खडसे हे पॉझिटिव्ह आले आणि आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल गुरुवारी एका दिवसातच राज्यात जवळपास 5 हजार 427 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. राज्यातील व्हीआयपी पर्सन व्यक्तींनाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांनी सतर्क होण्याची वेळ आली आहे.