महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंड : शासनाच्या निर्देशाप्रमाणे दौंड तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या वतीने राबविल्या गेलेल्या महाराजस्व अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दौंड तालुक्यामध्ये 1ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महसूल पंधरावडा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व तहसीलदार अरुण शेलार यांच्या नियोजनातून तालुक्यातील मंडळ स्तरावर फेरफार अदालत, वृक्षारोपण, सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, वृद्धांसाठी विविध योजनचा लाभ देणे, दिव्यांगासाठी विविध योजनचा लाभ देणे, विधवा निराधार महिलांसाठी विविध योजनचा लाभ देणे योजना, लाडकी बहीण योजना, पीएम किसान योजना यासारख्या योजनांचा मंडळ स्तरावरच प्रकरण दाखल करून निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

असाच कार्यक्रम महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर प्रत्येक आठवड्याच्या प्रत्यके गुरुवारी तालुक्यातील दोन मंडळात शासनाच्या विविध योजना तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच शेती विषयक समस्या अडचणी समजावून घेऊन प्रत्यक्ष मंडळ स्तरावर तालुक्यातील विभाग प्रमुख यांनी उपस्थित राहून या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देशाने महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.

वृक्षारोपणा च्या उपक्रमाने अभियानाला सुरुवात

अभियानाची सुरुवात वृक्षारोपण उपक्रमाणे केली जात असून त्यानंतर सर्व विभाग प्रमुख तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित असतात. नागरिकांनी त्यांना ज्या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्याचा फॉर्म भरून दिल्यानंतर जे लाभ प्रत्यक्ष त्याचा ठिकाणीं मंजूर करू शकत असल्यास त्यांचा त्याच ठिकाणीं अर्ज निकाली काढण्यात येतो, अन्यथा त्यावर मार्किंग करून ते त्या त्या विभागाला पुढील कार्यवाही साठी पाठविण्यात येतो. आज अखेर रावणगाव मंडळ, देऊळगाव राजे मंडळ दौंड, मंडल पाटस, केडगाव, वरवंड मंडल या ठिकाणी शासनाचा महा राजस्व अभियानाचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

यामध्ये महसूलच्या पुरवठा विषयक बाबी, दुष्काळ अनुदान ,उत्पन्नाचे दाखले ,जातीचे दाखले, डोमिसाईल सामाजिक सहाय्य योजनेचे लाभ , दुय्यम रेशन कार्ड, नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड ,नवीन मतदार नोंदणी, आधार नोंदणी ,आधार दुरुस्ती, शेतीचे प्रश्न, वहिवाट रस्त्याचे प्रश्न, सातबारा दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंदी, याबाबतच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व ठिकाणी दौंड उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व श्री अरुण शेलार (तहसीलदार दौंड) यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व उपस्थित नागरिकांचे अडचणी व समस्या जाणून घेऊन त्या प्रत्यक्ष सोडवण्याचा प्रयत्न केला.

दिनांक 29 ऑगस्ट रोजी महाराजस्व अभियानाचा तिसरा टप्पा ( गुरुवार) वरवंड मंडळ व केडगाव मंडळ स्तरावर पार पडला. या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. वरवंड ठिकाणी एकूण 415 अर्ज प्राप्त झाले त्यापैकी बरेच अर्ज त्याच ठिकाणीं निकाली काढण्यात आले. रेशन कार्ड मधून नाव कमी करणे, उत्पन्नाचे दाखले ,आधार दुरुस्ती, संजय गांधी चे अर्ज भरणे ,दुय्यम रेशन कार्ड, प्रत्यक्ष त्याच ठिकाणी वाटप करण्यात आले. केडगाव मंडळ मध्ये सुद्धा नागरिकांनी गर्दी करून योजनेचा लाभ घेतला. यामध्ये तालुक्यातील सर्व पोलीस पाटील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कोतवाल सर्व तलाठी,सर्व मंडळ अधिकारी, महासेवा केंद्र चालक, तहसील व इतर विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी नियोजन केले.
महाराजस्व अभियान अंतर्गत सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महसूल चे वरिष्ठ अधिकारी आपल्या गावाजवळ मंडळ मुख्यालयी उपस्थित राहून विविध योजनेचे मार्गदर्शन ,अर्ज स्वीकारणे व अडचणी समजून घेत असल्याकारणाने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
असाच उपक्रम पुढील गुरुवारी यवत याठिकाणी होणार असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे.