दौंड तालुक्यातून ‛हे’ 2 वाळु माफीया ‛तडीपार’



दौंड : सहकारनामा

पुणे जिल्हयातील दौंड तालुक्यात जलद पैसा कमवण्याच्या उद्देशाने बेकायदेशिर वाळु उपसा करण्याचे व्यवसायात गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी पाय रोवणेस सुरूवात केली असुन यातुन टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्यांनी या व्यवसायातुन मिळालेल्या पैशातुन चैनीच्या सुखवस्तु, सोने, महागडे मोबाईल, चारचाकी गाडया

घेणे तसेच नविन तरुण मुलांना आकर्षित करून टोळी बनवुन दहशत पसरविणे व एक मेकांविरूध्द कुरघोडी करणे, अवैध अग्निशस्त्रे बाळगुन धाक दाखवणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, सर्व सामान्य जनतेला त्रास देणे अशा गुन्हेगारी कारवायांना उधाण आले होते.

अशा गुन्हेगारी कारवायांना आळा घालणेकरीता या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करणेबाबत डॉ.श्री.अभिनव देशमुख (पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण) यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत.

त्याअनुषंगाने प्रभारी अधिकारी दौड पोलीस स्टेशन यांनी वाळु व्यवसायात टोळीने गुन्हे करणारे हद्दपार इसम विष्णु उर्फ लाला बलभिम अमनार (वय वर्षे २६ रा.मलठण , ता. दौंड , जि.पुणे) व नितीन

सुनिल लवंगारे (वय वर्षे २१ रा. मलठण ता. दौंड जि.पुणे) यांना हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव सादर केला होता.

सदर हद्दपार प्रस्तावाचे चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले की, यातील इसम विष्णु उर्फ लाला बलभिम अमनार व नितीन सुनिल लवंगारे यांची एक टोळी असुन त्यांचेवर वाळु व्यवसायात टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी खंडणी न दिल्याने खुन, गंभीर दुखापत, विनयभंग, शिवीगाळ दमदाटी असे गंभीर गुन्हेगारी दखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यांच्या या हालचालीमुळे दौंड तालुक्यात पर्यायाने पुणे जिल्हयात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

सदर टोळीची बेकायदेशिर कृत्ये रोखण्यासाठी तसेच त्यांना हिंसेपासुन परावृत्त करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे सुरक्षिततेसाठी सदर टोळी पुणे जिल्हयातुन हददपार करणे आवश्यक होते. त्यामुळे डॉ.अभिनव देशमुख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दौड पोलीस ठाणेचा हद्दपारीचा प्रस्ताव, चौकशी अहवाल व सर्व पुरावे विचारात घेता सर्व बाबींचा व्यापक विचार करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अनुसार पुणे जिल्हयातील दौड, शिरूर, इंदापुर, बारामतीसह अहमदनगर

जिल्हयातील श्रीगोंदा व सोलापुर जिल्हयातील करमाळा या संपूर्ण तालुक्यातुन चार महिने (२१ जुन २०२१ पर्यंत) या कालावधी करीता हद्दपारीचा आदेश जारी केला आहे अशी माहिती पुणे ग्रामिण पोलिसांनी दिली आहे.