लग्नास आलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 70 हजारांचे दागिने पळविले



लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

मंगलकार्यालया शेजारी असलेल्या शेतामध्ये गेलेल्या एका विवाहित महिलेचे सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. 

हि घटना कुंजीरवाडी (ता. हवेली ) हद्दीतील एका खाजगी मंगलकार्यालयात सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून  

याप्रकरणी संध्याराणी सतीश सोनवणे (वय- 45 रा. लोणंद ता. खंडाळा, जि. सातारा ) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात लोणी काळभोर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याराणी सोनवणे घरकाम करतात त्या सोमवार दि. 22 फेब्रुवारी रोजी नातेवाईकाचे लग्न असल्याने कुंजीरवाडी येथील एका खाजगी मंगल कार्यालयात आल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर मंगलकार्यालया शेजारी असणाऱ्या शेतात त्या नातेवाईकांसह फिरण्यास गेल्या होत्या.

तेथून परत येताना त्यांच्या शेजारून एक अनोळखी इसम (वय अंदाजे 25 ते 30 वर्ष) अंगाने सडपातळ, अंगात काळे रंगाचा शर्ट घातलेला व त्यावरती फुले असलेला शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव असलेला त्याने काही समजण्याच्या आतच संध्याराणी सोनवणे यांना धक्का दिला. व गळ्यामधील सोन्याचे दागिने हिसकावून अंधाराचा फायदा घेत त्या ठिकाणाहून तो पळून गेला. 

फिर्यादी यांनी घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून त्या इसमाचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. यावरून एकूण दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचे  सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांमध्ये त्यांनी फिर्याद दिली आहे.

लोणीकाळभोर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.