पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हाट्सअप हॅक झाल्याची गंभीर घटना दौंडच्या पाटस येथे घडली आहे. याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अधिक चौकशीसाठी हे प्रकरण आता सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अश्यातच आता निवडणुकीपूर्वी नेत्यांचे फोन हॅक होण्याची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या 20 पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सॲप हॅक करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि पदाधिकाऱ्यांचे मोबाईल हॅक करणाऱ्या हॅकर चे सेंटर बिहार असल्याचे तपासात समोर येत आहे. हॅकरने सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करून खात्यातून 200 डॉलर्स आणि संपर्क क्रमांक ठेवलेल्या लोकांचे 15 ते 20 हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून त्यावर पैशांची मागणी करण्यात आली.
खा.सुप्रिया सुळे यांचे अकाउंट, मोबाईल हॅक करणाऱ्या व्यक्तीचे नाव भालकेश कुमार असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीकडून इतर पदाधिकाऱ्यांनाही यूपीआयच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांचे अकाउंट हॅक करणाऱ्या या व्यक्तीचा आता पोलिस शोध घेत आहेत.