चोरट्यांनी घरात घुसून पोटाला चाकू लावला, सोने लुटले | 1 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील वासुंदे गावात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून घातक शस्त्रांचा धाक दाखवीत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी तब्बल 1 लाख 30 हजार 500 रुपयांच्या च्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

याप्रकरणी सत्यभामा रामदास लोंढे (वय 60,रा. वासुंदे, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यां विरोधात भारतीय न्याय संहिता (2023),कलम 309(4),331(4),3(5) अन्वये पुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 9 ऑगस्ट रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे.

शिंदे फडणवीसांच्या अटकेचा कट ठाकरे, पवारांच्या निवासस्थानी शिजला..

फिर्यादी सत्यभामा लोंढे ह्या पतीसोबत घरामध्ये बोलत बसल्या होत्या. त्या दरम्यान कुणीतरी त्यांना हाका मारू लागले. फिर्यादी यांनी खिडकीजवळ जाऊन त्यांना तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली असता, मी दीपक चा मित्र आहे असे तो सांगू लागला तेव्हा फिर्यादी यांच्या पतीने त्याला सांगितले की आता खूप उशीर झाला आहे तुम्ही लवकर यायचे होते. त्यावेळी त्याने दार उघडा- दार उघडा असा आरडाओरडा करीत दरवाजा जोराने ढकलून दरवाजा उघडला. तीन अज्ञात लोक घरात शिरले, तिघांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते. त्यांचे अंदाजे वय 20 ते 26 वर्ष असावे.

घरात शिरताच त्यांनी दमदाटी सुरू केली. त्या पैकी एकाने त्याच्या जवळील चाकू काढला व फिर्यादी यांच्या पतीच्या पोटाला लावला. जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम द्या अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी भीतीपोटी स्वतःकडील सोन्याचे दागिने व पैसे असलेले पाकीट चोरट्यांना दिले. दुसऱ्या एका चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर पहाटे 5 च्या दरम्यान दुचाकीवर एक जण आला, त्याने हेल्मेट परिधान केलेले होते. घटनेची पोलिसांकडे तक्रार केली तर तुम्हाला जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन तो निघून गेला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.