चोरट्यांचा प्रताप | चोरलेल्या 5 मोटर  फेकल्या शेतकऱ्याच्या शेतात | केडगाव येथील घटना

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे चोरट्यांनी चोरी करून आणलेल्या 5  इलेक्ट्रिक मोटर शेतकऱ्याच्या शेतात फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या सर्व इलेक्ट्रिक मोटारमधील तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य चोरी करून त्या राजेंद्र मलभारे यांच्या शेतामध्ये फेकून देण्यात आल्या होत्या अशी माहिती त्यांनी दिली असून याबाबत राजेंद्र मलभारे त्यांनी यवत पोलिसांना खबर दिली आहे.

केडगाव गावठाण गट नं गट नं. 105 मध्ये शुभम राजेंद्र मलभारे यांची शेत जमीन आहे. त्यांनी या शेतामध्ये उसाचे पीक घेतले असून उसाला तोड आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. नदी, कॅनॉल, विहिरिंमधील पाणी उपसा करणारे इलेक्ट्रिक मोटर पंप हे चोरटे चोरी करतात. त्यानंतर त्यातील तांब्याच्या तारा आणि इतर साहित्य चोरी करतात. मोटारीचा राहिलेला भाग ते कोठेतरी फेकून देतात अश्या अनेक घटना दौंड तालुक्यात या अगोदर घडल्या आहेत.

विहीर आणि कॅनॉलचे पाणी शेतात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पाण्यावरील इलेक्ट्रिक मोटर चोरट्यांनी नेमक्या कधी येथे आणून टाकल्या याबाबत मात्र अजून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. उसाची तोड सुरु असताना या मोटर येथील ऊसतोड कामगारांना दिसल्या त्यानंतर त्यांनी राजेंद्र मलभारे यांना याची खबर दिली. घटनेची माहिती समजताच मलभारे यांनी यवत पोलिसांना याची खबर दिली आहे.