दौंड | दोन प्रकरणांनी देऊळगाव गाडा गाजू लागले, खा. सुप्रिया सुळेंनीही वेधले लक्ष – PMGSY योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे तर स्टोन क्रशर आणि डांबर प्लांटला विरोध

दौंड : नारायण महाराज बेट या प्रसिद्ध ठिकाणी असलेले दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा हे गाव सध्या दोन प्रकारणांमुळे चांगलेच गाजत आहे.

यातील पहिले प्रकरण हे येथील स्टोन क्रशर आणि डांबर प्लांट चे आहे. या दोन्ही प्लांट मुळे येथील सद्गुरू नारायण महाराज बेट परिसराला धोका उद्भवू शकतो असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून येथील नागरिकांनाही याचा मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळे हे दोन्ही प्लांट चे काम तात्काळ बंद करावे अशी मागणी सद्गुरू नारायण महाराज ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केली आहे.

या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनीही लक्ष घातले असून पाहूया त्यांनी काय म्हटलं आहे – देऊळगाव गाडा, ता. दौंड येथील गट नं ५६ व २५ मध्ये मल्हार स्टोन क्रशर व डांबर प्लांट खाणपट्टा देण्यात आला आहे. परंतु याला ग्रामस्थांचा विरोध असून यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. सदर दोन्ही प्रकल्प श्री सद्गुरू नारायण महाराज या तीर्थक्षेत्राच्या आसपास होऊ घातले आहेत. या देवस्थानाला या दोन्ही प्रकल्पांपासून धोका आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून ग्रामस्थांशी संवाद साधावा. तथा हे दोन्ही प्रकल्प बंद करण्याची कार्यवाही करावी.
खा. सुप्रिया सुळे (बारामती लोकसभा मतदार संघ)

दुसरे प्रकरण हे येथे सुरु असलेल्या PMGSY रस्त्याचे असून येथील ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप केला आहे. दोन-तीन दिवसांतच या सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असून या रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या कामाची चौकशी करून हे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.