अख्तर काझी
दौंड : शहरातील गांधी चौकामध्ये दौंड नगरपालिकेची मुख्य भाजी मंडई आहे. याच भाजी मंडईच्या मुख्य प्रवेशद्वार परिसरातील गटारींची दुरवस्था झालेली पाहायला मिळत आहे. या गटारी मध्ये गाळ साठुन ती पूर्णपणे तुंबलेली आहेत, ज्यामुळे गटारीचे घाण पाणी संपूर्ण रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. भाजी मंडई मध्ये येणारे ग्राहक याच घाण पाण्यातून कशीबशी आपली वाट शोधताना दिसत आहेत, महिलांना तर या रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. परिसरात साचलेल्या घाण पाण्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील विक्रेते रस्त्यावरून वाहणाऱ्या घाण पाण्यातच हातगाड्यांवर फळे व खाद्यपदार्थ विकत आहेत.
साचलेल्या घाण पाण्यामुळे ग्राहक या ठिकाणी फळे व खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी थांबायला तयार नाहीत, त्यामुळे या रस्त्यावर असणारे फळ विक्रेत्यांचे हातगाडे व्यवसायाविना बंद ठेवावे लागले आहेत अशी परिस्थिती झाली आहे. या विक्रेत्यांनी आपला व्यवसाय कोठे करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. काही दिवसापासून व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या मालाची ही नासाडी होत आहे.
या संतापजनक प्रकारामुळे आज या विक्रेत्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि त्यांनी थेट नगरपालिकेवर मोर्चा काढून आपली नाराजी व्यक्त केली, व नगरपालिकेने त्वरित या गटारींची साफसफाई करून रस्ता स्वच्छ करून देण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला. घटनेचे गांभीर्य पाहून व वस्तुस्थिती खरी असल्याने नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, गटारीचे काम करणारे ठेकेदार यांनी भाजी मंडई येथे जाऊन गटार कामांची पाहणी केली आहे.
येथील व्यापाऱ्यांच्या, छोट्या विक्रेत्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्वरित काम सुरू करणार असल्याचे सांगितल्याने स्थानिक नागरिक व विक्रेते तूर्तास शांत झाले आहेत.
नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वीची जी कामे करणे आवश्यक होते ती न केल्याने शहरात पाऊस सुरू झाला की शहरातील सर्वच झोपडपट्टी प्रभागातील गटारी तुंबून त्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते, काही प्रभागात तर गटारीचे घाण पाणी लोकांच्या घरामध्ये जाते आहे. अशी सर्व परिस्थिती असतानाही नगरपालिका प्रशासन तसेच नगरपालिका निवडणुका लढणारे राजकीय पक्ष यांना हा विषय गांभीर्याने घ्यायला वेळ नाही.
नगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने नगरपालिकेला कोणी वालीच राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. आणि ज्यांना भविष्यात नगरसेवक व्हायचे आहे त्यांना सध्या लोकांची कामे करण्यात व त्यांच्या समस्या सोडविण्यात रस नाही असे चित्र आहे. आज ना उद्या नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे आमचा होणारा तमाशा लांबून पाहणाऱ्या व नगरसेवक होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांनी हे विसरू नये आणि आम्हाला गृहीत धरण्याची चूक करू नये अशा प्रतिक्रिया समस्याग्रस्त दौंडकरांकडून येऊ लागल्या आहेत.