अब्बास शेख
राजकीय : दौंड तालुक्यात रमेशआप्पा आणि राहुलदादा ही राजकीय पटलावरील दोन प्रमुख नावे आहेत. दौंडचे दिवंगत सुभाषआण्णा यांच्या अकाली निधनानंतर गेल्या वीस वर्षांपासून राहुल कुल आणि रमेश थोरात या दोन नेत्यांमध्ये थेट 3 विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यात एकदा रमेश थोरात हे आमदार बनले तर दोनवेळा राहुल कुल हे आमदार झाले आहेत. सध्या दौंड तालुक्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असून तालुक्यात पुन्हा एकदा ‘दादा’ विरुद्ध ‘आप्पा’ असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.
माजी आमदार रमेश थोरात हे अजित दादांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी लोकसभेला सुनेत्रा पवार यांचे काम केले तर महायुती धर्म म्हणून आमदार राहुल कुल यांनीही सुनेत्रा पवार यांचे काम केले आहे. थोरात आणि कुल यांनी एकत्रितपणे सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र निकाल लागल्यानंतर दौंड तालुक्यातून सुनेत्रा पवार ह्या तब्बल 26 हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर राहिल्या. दौंड तालुक्यातून सुनेत्रा पवारांची पीछेहाट ही कुल – थोरात या दोन्ही गटाला आत्मचिंतन करायला लावणारी होती. मात्र आत्म चिंतन तर सोडाच उलट या दोन्ही गटातील कार्यकर्ते आता दुसऱ्यावर आरोप करू लागले आहेत. सुनेत्रा पवारांचे आम्ही काम केले मात्र तुम्ही काम केले नाही असा काहीसा आरोप प्रत्यारोपाचा प्रकार येथे पहायला मिळत आहे.
‘रमेशआप्पा’ अपक्ष निवडणूक लढवणार, कार्यकर्ते लागले कामाला
कुल-थोरात गटाचे एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता माजी आमदार रमेश थोरात हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. त्यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी काही कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर रमेश थोरातांनी अपक्ष निवडणूक लढवून 2009 ची पुनरावृत्ती करावी असे अनेक कार्यकर्त्यांचे मत येत असून त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 742 मतांनी पराभव स्वीकारावा लागलेल्या रमेश थोरातांचा आता मात्र विजय होईल अशी खात्री त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. राज्यात असणारी बीजेपी विरोधी लाट आणि रमेश थोरात यांना मानणारा लोकवर्ग यांच्या जोरावर रमेश थोरात यावेळी निश्चित करिष्मा दाखवतील असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
आमदार ‘राहुलदादा’ यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता
दौंड चे भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अजितदादा पवार गटाचे रमेशआप्पा हे अपक्ष उभे राहतील असे चित्र सध्या दिसत आहे. भाजपकडून मिळालेला विकास निधी आणि झालेली विकासकामे याच्या जोरावर आमदार राहुल कुल यांचा विजय निश्चित होईल असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजप आमदार राहुल कुल हे प्रधानमंत्री आवास योजना, जल सिंचन, पेय जल योजना, आमदार फ़ंड आणि केंद्र व राज्यसरकार यांच्या निधीतून झालेली विकासकामे यांच्या जोरावर मतदारांना आपलेसे करतील असे सांगितले जात आहे.
शरदचंद्र पवार गटाकडून ‘आप्पासाहेब पवार’ इच्छुक
शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून दौंड तालुक्यात आप्पासाहेब पवार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते जुने पदाधिकारी असून त्यांना यावेळी तुतारी चिन्हावर उमेदवारी मिळेल असे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. मात्र शरद पवारसाहेब हे ऐनवेळी कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एकंदरीत पाहता विधानसभा निवडणुकीत आप्पा विरुद्ध दादा हा पारंपारिक संघर्ष यावेळीही पहायला मिळणार असे सध्याचे चित्र दिसत आहे. यात विविध गावांतील प्रबळ नेत्यांची साथ कुणाला मिळते आणि जनता कुणाला यावेळी निवडून देते हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.