अखेर ‛गजा मारणे’ हि 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, महाबळेश्वर येथून LCB ने केली होती अटक



पुणे : सहकारनामा

पुण्यातील गँगस्टर गजा मारणे पुणे ग्रामीण LCB पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याला महाबळेश्वर, पाचगणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. 

तो या परिसरात फिरत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर LCB ला मिळाली होती त्यानंतर हि कारवाई करण्यात आली. 

गजा मारणे काही दिवसांपासून भूमिगत झाला होता त्यामुळे त्याला शोधून काढणे पोलिसांना गरजेचे बनले होते. पुणे ग्रामीण पोलिसानी मेढा जि.सातारा पोलीसांच्या मदतीने ट्रॅप लावून गजा मारणेला ताब्यात घेवून त्याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी केली. गजा मारणेवर यापूर्वी २२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

पुणे ग्रामीण पोलीसांनी ४ दिवसापूर्वीच गँगस्टर निलेश घायवळ याची १ वर्षासाठी येरवडा कारागृहात रवानगी केली.

पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मारणे टोळीचा म्होरक्या गँगस्टार नामे गजानन उर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (वय ५० वर्षे, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे मूळ रा.मारणेवाडी ता.मुळशी जि.पुणे) याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स) यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबतचा अधिनियम सन १९८१ (एम.पी.डी.ए.) कायदयातंर्गत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेमार्फत पाठविलेल्या प्रस्तावावर पुणे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्णय घेवून गजा मारणे यास एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश दिलेले आहेत.

मारणे टोळीचा म्होरक्या गजा मारणे यास पोलीस अधीक्षक यांचे सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पौड पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवून पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हापूर परिसरात फिरत असल्याची माहिती काढली होती. त्या भागात त्याचा माग काढून पुणे ग्रामीण पोलिसानी मेढा जि.सातारा पोलीसांच्या मदतीने ट्रॅप लावून गजा मारणेला ताब्यात घेत एक वर्षासाठी स्थानबध्द करणेसाठी त्याची येरवडा मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी केली आहे.