पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाची योजना असून या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी मोहिम स्तरावर कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्यात आलेल्या लाईव ऑनलाईन मिटिंगद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी दिवसे बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, सर्व उपविभागीय अधिकारी, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागातील अल्पभूधारक महिलांची यादी उपलब्ध असून त्यांच्याकडून त्वरीत अर्ज भरून घ्यावे. सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. शहरी भागात योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक दाखले गतीने उपलब्ध करून द्यावेत. यासोबत विविध विभागांकडे उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून पात्र महिलांची यादी तयार कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
पात्र महिलांच्या याद्या प्राप्त झाल्यावर गावपातळीवर त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्याची कार्यप्रणालीही निश्चित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पाटील म्हणाले, योजनेची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी माहिती पत्रके तयार करण्यात यावीत.
श्रीमती रंधवे यांनी सादरीकरणाद्वारे योजनेची माहिती दिली. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये रक्कम डीबीटीद्वारे बँक खात्यात दिली जाणार आहे. नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्ज अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा प्रभाग अधिकारी यांचेकडे सादर करावे. जिल्हास्तरावर मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.