वाळू माफियांविरोधात दौंड महसूल व पोलीस प्रशासनाची धडक कारवाई, 50 लाखाच्या यांत्रिक बोटी उध्वस्त



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रांमध्ये यांत्रिक बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात दौंड महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने धडक कारवाईची मोठी मोहीम सुरू केली असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. 

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तालुक्यातील खानोटा व वाटलुज भीमा नदी पात्रांमध्ये वाळू माफिया यांत्रिक बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करीत असून त्याची बेकायदेशीर पणे विक्री केली जात असल्याची खबर स्थानिकांकडून मिळाल्याने दौंड महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने वाळू माफियांच्या अड्ड्यांवर धाड टाकीत वाळू माफियांच्या सहा यांत्रिक बोटी( किंमत 50 लाख रु.) उध्वस्त केल्या तसेच या बोटींच्या मालकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 

अवैध वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यांत्रिक बोटी उध्वस्त करण्या बरोबरच वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याचा पोलीस प्रशासनाने सपाटाच लावल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. वाळू माफियांचा विषय थेट विधान सभा अधिवेशनातच गाजला असल्याने तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी येथील महसूल व पोलीस प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसते आहे. 

तहसीलदार संजय पाटील, मंडल अधिकारी मंगेश नेवसे, तलाठी वर्ग तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो. हवा. पांडुरंग थोरात,आसिफ शेख, किरण राऊत, अमोल गवळी, अमोल देवकाते यांच्या पथकाने कारवाई पार पाडली.