अख्तर काझी
दौंड : शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृति मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यावर निषेध आंदोलन करत मनुस्मृतीचे पोस्टर फाडले आहे. हे पोस्टर फाडताना त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाटल्याने त्यांचा निषेध केला जात आहे.
आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या हातून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाटला गेला असल्याचे समोर आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या या कृत्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने दौंड शहरातील आंबेडकरी विचारधारेच्या सर्व भीमसैनिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करून आव्हाड यांच्या कृत्याचा धिक्कार केला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचाही निषेध करण्यात आला आहे. भीमसैनिकांच्या वतीने निषेधाचे निवेदन दौंड पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी शहरातील सर्व आंबेडकरी विचार धारेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.