दौंड मध्ये आगीची दुर्घटना, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

अख्तर काझी
दौंड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या इमारतीला आग लागून इमारतीचे लाकडी खांब, तुळया व माळवदपूर्णपणे जळून गेले. या आगीत इमारतीच्या दर्शनी भागातील तीन दुकानांचे आतील सामान पूर्णपणे जळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

येथील हार व फुल विक्रेत्याच्या सजावटीचे सामान तसेच झेरॉक्स विक्रेत्याच्या दोन झेरॉक्स यंत्रे व एका लेडीज टेलरच्या दुकानाचे छत पूर्णपणे जळून खाली कोसळले आहे. आसिफ शेख, मुनीर शेख, संजय गुजर, वाहिद शेख या दुकानदारांच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळी साडेसहा ते साडेदहा वाजेपर्यंत चार तास पाण्याचा फवारा मारून दौंड नगरपरिषद, दौंड शुगरच्या अग्निशमन बंबांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

आग लागलेली इमारत टिनवाला बिल्डिंग या नावाने ओळखली जाते. दौंड शहरातील शिवाजी महाराज चौकापासून जवळ असलेली इमारत मोडकळीस आल्याने या इमारतीतील रहिवासी अन्यत्र राहावयास गेले आहेत. या इमारतीमध्ये सध्या कोणी रहावयास नसल्याने रात्री दुकाने बंद करून दुकानदार आपल्या घरी गेले होते. इमारतीला आग लागल्याचे शेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या सकाळी सहाच्या दरम्यान लक्षात आल्याने त्यांनी लागलीच दौंड नगर परिषद व इतर ठिकाणांवरील अग्निशामक यंत्रणांशी संपर्क साधला.