दौंड : (अख्तर काझी)
क्रिकेट मॅच पहात असताना झालेल्या वादातून येथील तीन तरुणांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नयन अविनाश गायकवाड (रा. खवटे हॉस्पिटल शेजारी, लिंगाळी रोड, दौंड) याने दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रणव पासलकर, अमित पासलकर, आकाश शिंदे, बाळू कडू, राहुल पासलकर( सर्व राहणार पासलकर वस्ती, लिंगाळी, दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी,दि.16 रोजी, रात्री 8.30वा. दरम्यान फिर्यादी, त्याचा भाऊ सोहन निळकंठ गायकवाड व मित्र येथील जनता माध्यमिक शाळेच्या मैदानावर सुरू असलेली क्रिकेट मॅच पहात उभे होते. त्यावेळी त्या ठिकाणी मॅच पहात असलेला राहुल पासलकर हा आरडा ओरडा करीत होता त्यामुळे फिर्यादीचे भाऊ सोहन याने त्यास बाजूला थांब, आरडा ओरडा करू नकोस असे सांगितले असता तो सोहन यालाच उलटे बोलू लागला. त्यावेळी सोहन याने थांब तुझ्या वडिलांनाच सांगतो असे म्हणताच राहुल तेथून रागाने निघून गेला. मॅच संपल्यानंतर फिर्यादी, भाऊ सोहन व मित्र यांनी राहुल याच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना राहुल कसे चुकीचे वागला असल्याचे सांगत असतानाच त्या ठिकाणी अचानक पणे 4 ते 5 युवक हातात लाकडी दांडके, बॅट घेऊन आले व त्यांनी फिर्यादी व त्यांच्या बरोबर असणाऱ्या दोघांवर हल्ला चढविला. या तिघांच्या डोक्यावर, छातीवर व पायावर त्या युवकांनी लाकडी दांडक्याने व बॅटने जोरदार प्रहार केले. या मारहाणीत तिघेही जखमी झालेले आहेत, तिघांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
यापैकी एकाच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्यास तपासणीसाठी बारामतीला हलविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड शहर युवा अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी दिली आहे.