दौंडकरांनो सावधान! शहर व परिसरात कोरोनाचा वाढतोय जोर! मागील तीन दिवसांमध्ये फक्त शहरातील 83 जण कोरोनाच्या विळख्यात



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

शहर व परिसरामध्ये कोरोना ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याचे गंभीर चित्र सध्या पहायला मिळत आहे. मागील तीन दिवसांमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार फक्त शहरातील तब्बल 83 जणांना कोरोना चा संसर्ग झाला आहे, व रोज कोरोना रुग्ण वाढतच आहे. ही बाब प्रशासनाबरोबरच शहरासाठी ही फारच चिंताजनक व विचार करायला लावणारी आहे. त्यामुळेच दौंड करांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिशय जबाबदारीने वागण्याची वेळ आता आली आहे. कोरोना चा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी प्रत्येकाने करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. 

नागरिकांनी जर वेळीच या गोष्टींची( मास्क, सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे) अंमलबजावणी केली नाही तर पूर्वी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मग प्रशासन कठोर निर्णय घेतील असे वाटते, आणि जे कोणाच्याच हिताचे नाही.

या महामारी पासून शहराचा बचाव करणे सर्वांचीच जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय, दौंड पोलीस व नगर पालिका प्रशासनाकडून वारंवार पणे करण्यात येत आहे. मागील वर्षी प्रमाणेच शहरात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढू लागली आहे अशा गंभीर परिस्थितीतही शहरातील 50 टक्के नागरिक बिनधास्तपणे विना मास्क शहरात फिरताना दिसत आहेत. सुरक्षित वावराच्या नियमाचा तर पुरता फज्जा उडविला जात आहे. 

यामुळे प्रशासनाची डोकेदुखी तर वाढणार आहेच,परंतु दौंडकरांचे ही मोठे नुकसान होणार आहे हे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. कोरोना ला जर तुम्ही सहज घ्याल तर मात्र शहराचे अवघड होणार यात शंका नाही. दौंड करांनो वेळीच जागे व्हा व जबाबदारीने वागा तरच कोरोना विरोधातील लढाई जिंकण्याचे चिन्हे दिसतील अन्यथा सर्वांनाच घरात बसावे लागेल जे कोणालाच परवडणारे नाही.