पुणे : पुणे येथील के जे इन्स्टिट्यूट मधील ट्रिनिटी पॉलिटेक्निक मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना कॉलेजचे प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले सामाजिक कार्य, त्याग, अभ्यास याचा आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बारा भाषा अवगत होत्या व त्यांनी पदव्या ग्रहण केल्या होत्या. त्यांनी शिक्षणाचा वापर हा सामाजिक परिवर्तनासाठी केला. आपण कमीत कमी तीन पदव्या घेऊन स्वतःचा विकास करण्याचे आव्हान डॉ.कांदे यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी वर्गाला केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. प्राशन केले तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे उदाहरण देऊन शिक्षणाने आयुष्य बदलण्यास पर्याय उपलब्ध होतात. आजच्या तरुण पिढीने त्यांचे जीवनचरित्र वाचावे व कठीण परिस्थितीत हार न मानता उच्चशिक्षित होऊन मिळालेल्या ज्ञानाचा, पदाचा समाज परिवर्तनासाठी उपयोग करावा असे डॉ. कांदे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी श्रीमती अश्विनी सस्ते यांनी देखील आंबेडकरांनी घेतलेल्या शिक्षणाचा व समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. सौ.सायली चाविर यांनी, आंबेडकरांनी घेतलेले शिक्षण व त्यातून केलेले समाज परिवर्तन याची माहिती देऊन आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच प्रा. प्रतीक्षा सणस यांनी देखील आपल्या मनोगतातून आंबेडकरांना अभिवादन केले. प्रा.संतोष डोईफोडे, प्रा. सारिका कोरडे प्रा. स्मिता जगताप प्रा. वैभव पोमण प्रा.भैरवनाथ जाधव प्रा. साद सवाल हे कार्यक्रमास उपस्थित होते.
संस्थेचे संकुल संचालक समीर कल्ला व संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रंथपाल श्रीमती स्वाती मते यांनी केले तर प्रा. स्मिता जगताप यांनी आभार मानले.