सांगली : खानापूर तालुक्यातील वाळूजमध्ये बैलगाडा शर्यतीमध्ये चाकाखाली सापडून एका तरुण ठार झाला. ही घटना आज रविवारी घडली आहे. रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हा अपघात घडल्यानंतर रोहनला त्वरीत विटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. रोहन हा गावात सुरु असलेल्या यात्रेतील बैलगाडे पळवण्याची शर्यत पाहण्यासाठी आला होता. वाळूज येथील यात्रेनिमित्त खडी येथे बैलगाडे पळविण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.
गावातील परंपरेनुसार बैलगाडे पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र यातील एक बैलगाडा हा धावत असताना थेट शर्यत पाहण्यास आलेल्या लोकांच्या गर्दीत घुसला. अचानक बैलगाडा गर्दीत घुसल्याने लोकांमध्ये भीती पसरून धावपळ सुरु झाली. यात रोहन घोरपडे हा पळत असताना पाय घसरून तो जमिनीवर याच वेळी मागून आलेल्या बैलगाड्याचे चाक हे त्याच्या अंगावरून गेले आणि तो यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.