अब्बास शेख
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी एडी चोटी का जोर लावला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी विविध तालुक्यातील मोहरे आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज या नेत्यासोबत प्रचारात दिसणारे स्थानिक नेते उद्या विरोधी नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत.
सध्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त नजरा ह्या बारामती लोकसभा मतदार संघाकडे खिळून राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुनेत्रा पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे ह्या पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात काटे की टक्कर होणार हे आता दिसू लागले आहे. या दोन्ही पक्षांनी विविध तालुक्यांमध्ये बैठकांचा घाट घातला आहे.
प्रत्येक तालुक्यात दर आठवड्याला दोन तीन बैठका घेऊन लोकांच्या मनात आपले विचार बिंबविण्याची संधी दोन्ही पक्ष सोडताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आपल्याकडे वळविण्यासाठी मोठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे. इंदापूर येथे कालपर्यंत शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबत फिरणारे माने आता अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत फिरताना दिसत आहेत.
याचा बदला घेण्यासाठी आता शरद पवार हेही दौंड तालुक्यात महायुतीच्या आमदारांसोबत काम करणाऱ्या प्रेमसुख कटारिया या दिग्गज नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी खलबते करताना दिसत आहेत. ज्यांना शिरूर लोकसभा मतदार संघात उमेदवारी देण्यात आली ते मंगलदास बांदल हे बारामती लोकसभा मतदार संघात जाऊन महायुतीच्या बैठकांना हजेरी लावत असल्याचे दिसताच वंचित कडून त्यांची उमेदवारी रद्द करण्यापर्यंत वातावरण तप्त बनले आहे.
एकंदरीतच आता वातावरण फिरू लागले आहे आणि आपला पारंपारिक गड राखण्यासाठी आता शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी रस्सीखेच सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांच्या रस्सीखेचिमुळे कार्यकर्ते मात्र ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ हे गाणे गुणगुणताना दिसत आहेत.