पुरंदर : राज्यातील सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसत आहे. आपण अजित पवारांना कमीत कमी 50 हजारांचे लीड देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून आपण जर विरोध करत राहिलो असतो तर किमान 15-16 जागांवर आपले उमेदवार धोक्यात आले असते असे विधानही त्यांनी केले आहे.
मध्यंतरी माजी मंत्री विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यावेळी शिवतारे यांनी शिवराळ भाषेत अजित पवारांचा समाचार घेतला होता त्यामुळे अजित पवार गट मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता. जर अजित पवारांच्या उमेदवाराला बारामती लोकसभा मतदार संघात दगा फटका झाला तर त्याचे परिणाम संपूर्ण राज्यातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये पहायला मिळतील असा ईशाराही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. या सर्व वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्या बैठकीत हा वाद अखेर मिटला. काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सर्व नेत्यांची सुमारे दीड तास बैठक झाली.
त्यानंतर आज विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत आपण बारामती लोकसभा मतदार संघातून माघार घेत असून आपण अजितदादांच्या उमेदवाराला कमीत कमी 50 हजारांचे लीड (मताधिक्य) देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.