पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात सर्वात स्फोटक वक्तव्येकरून खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्यावर आता पक्षाकडून कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत शिवतारे यांना लवकरच शिस्तभंगाची नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीला आपण उभे राहणार असल्याचे या अगोदरच जाहीर केले होते. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवारांचे काम करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मागील विधानसभा निवडणुकीला अजित पवार यांनी शिवतारे कसे निवडून येतात हेच पाहतो असे म्हणाले होते. या निवडणुकीत शिवतारे यांचा पराभव झाल्याने त्यांचे आणि पवारांचे चांगलेच बिनसले होते. याचाच वचपा काढण्यासाठी आता विजय शिवतारे यांनी कंबर कसली आहे.
विजय शिवतारे यांनी काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर खालच्या पातळीला जाऊन टिका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कमालीचे अस्वस्थ झाल्याचे दिसत आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालून शिवतारेंना गप्प करावे अन्यथा आम्ही जशासतसे उत्तर देऊ असा ईशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारे यांच्यावर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.