लोकसभा निवडणूक 2024
बारामती : सध्या बारामती लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कमालीचा तणाव वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता थेट अजित पवारांना टार्गेट केल्याचे दिसत आहे. त्यांच्या दररोजच्या वक्तव्यांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाल्याचे दिसत असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री शिंदे यांना आवाहन केले आहे. शिवतारेंना रोखा अन्यथा आमचाही सय्यम आता संपेल असा ईशारा राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांनी दिला आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील महेश भागवत यांची स्फोटक मुलाखत
वैशाली नागवडे यांनी, मुख्यमंत्री शिंदे साहेब विजय शिवतारेंना आवरा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याचा अंत बघू नका. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा आमचे नेते आहेत. त्यांच्यावर काहीही बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. राजकारण, निवडणूक होत राहतील पण अजित पवारांना अशा पद्धतीने बोललेलं आम्ही सहन करणार नाही. महायुतीतल्या शिवसेना उमेदवारांना राष्ट्रवादी ची गरज नाही का ? असा सवालही वैशाली नागवडे यांनी उपस्थित केला आहे.
बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय वाद विकोपाला गेला असताना यामध्ये विजय शिवतारे यांनी उडी घेत अजित पवारांवर चौफेर टिका सुरु केली आहे. त्यांच्या या टिकेमुळे अजित पवार गट कमालीचा संतप्त झाला असून जशासतसे उत्तर देण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. शिवतारेंच्या टिकेमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे यापुढे शिवतारे यांनी अजित पवारांवर टिका केली तर त्यास राष्ट्रवादी कश्या पद्धतीने उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.