अख्तर काझी
दौंड : चेन्नई- मुंबई एक्सप्रेस गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे 8 लाख 10 हजार रुपये किमतीची दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सदरची घटना दि. 20 मार्च रोजी सकाळी 6.30 च्या दरम्यान दौंड रेल्वे हद्दीत घडली. याप्रकरणी राहुल शेषराम (रा. सुब्रमाने कोयल स्टेट जवळ, पार प्रार्थना गॅस एजन्सी, मुबार,संपेट कांजीपुरम, चेन्नई) यांनी फिर्याद दिली असून दौंड लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेन्नई-मुंबई एक्सप्रेस गाडीने पुण्याला जाण्यासाठी प्रवास करीत असताना त्यांच्याजवळ दोन बॅगा होत्या. दि. 20 मार्च रोजी सकाळी 6.30 च्या दरम्यान फिर्यादी झोपलेले असताना, गाडी दौंड स्टेशनला येण्याआधी 10 मिनिटांपूर्वी पूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्याकडील एक बॅग चोरून नेली. बॅगेमध्ये 8 लाख 10 हजार रु. किमतीचे सोन्याचे दागिने होते. गाडी दौंड रेल्वे स्थानकात आल्यानंतर बॅग चोरीला गेल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. व त्यांनी गाडीमध्ये ड्युटीवर असणाऱ्या तिकीट तपासणीसा कडे सदर घटनेची तक्रार केली.
दौंड रेल्वे स्थानक आणि दौंड कार्ड लाईन रेल्वे स्थानक कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे नेहमीच वादग्रस्त ठरत आहेत. या दोन्ही स्थानकाच्या परिसरात हाणामाऱ्या, प्रवाशांची लुटालुट अशा घटना सर्रासपणे घडत असतात. या परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मारहाण करून लुटमार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसहित रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं बिनधास्तपणे रेल्वे स्थानकात फिरत असतात त्यांना कोणाचाही अटकाव नसतो. दौंड रेल्वे स्थानकाचा ताबा घेतल्याप्रमाणेच ते स्थानकावर ठाण मांडून असतात कोणीच त्यांना अटकाव करत नसल्यामुळे गुन्हे करण्यासाठी त्यांना मोकळे रान मिळत आहे. अशा लोकांना लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दल पोलिसांनी रेल्वे स्थानकातून हुसकावुन लावणे गरजेचे झाले आहे. दौंड-पुणे दरम्यानच्या काही गाड्यांना प्रवाशांकडून पैसे गोळा करण्याचे काम तृतीय पंथीय बिनधास्तपणे करीत आहेत त्यांनाही कोणाची भीती नाही. या सर्व प्रकारांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहून त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.