आमदार रोहीत पवार, युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका ! पोलीस प्रोटेक्शनची मागणी

पुणे : बारामती लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे बारामतीचे वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनू लागले आहे. आतातर आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीविताला धोका असल्याचे बोलले जात असून याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षकांना सुरक्षा पुरविण्यासाठी थेट पत्र लिहिले आहे.

आमदार रोहीत पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना लिहीले आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

पत्रामध्ये नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आ.रोहित पवार व युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून आ.रोहित पवार व युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वासवाटतो. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.