बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांचा भेटीगाठी-बैठकांवर जोर, महेश भागवत यांच्याही बैठकांना मोठा प्रतिसाद

अब्बास शेख

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार हे आपापल्या परीने विविध तालुक्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी आणि घोंगडी बैठकांवर जोर देताना दिसत आहेत. या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, लोकसभेचे इच्छुक उमेदवार सुनेत्रा पवार, महेश भागवत हे अग्रेसर असल्याचे दिसत आहेत. विजय शिवतारे यांनी जरी आपण अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले असले तरी लोकसभेची उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते माघार होईपर्यंत ते नेमका काय निर्णय घेतात हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.

लोकसभा 2024 च्या निवडणुकीचे बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांची आपापले गड राखण्यासाठीची धडपड सुरु झाली असल्याचे पहायला मिळत आहे. प्रामुख्याने सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये तळ ठोकत प्रत्येक कार्यकर्त्याला संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे तर या दोन्ही उमेदवारांना तगडे आव्हान उभे करणारे महेश भागवत यांनी दौंड तालुक्यातून आपली सूत्रे हलविण्यास सुरुवात केली आहे. महेश भागवत हे स्वतः ओबीसी समाजाचे असल्याने त्यांच्यामागे ओबीसी वर्गाची मोठी फळी उभी राहताना दिसत आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे संपूर्ण पवार फॅमिली उभी राहिल्याचे दिसत असून विविध तालुक्यामधील शरद पवारांचे नवे-जुने सर्वच कार्यकर्ते येथे कामाला लागले असल्याचे पहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार यांच्यामागेही त्यांना मानणारे कार्यकर्ते, विविध तालुक्यातील अजित पवारांचे खंदे समर्थक आणि महायुतीचे कार्यकर्ते येथे सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहेत. महेश भागवत यांनी अगोदर चाचपणी करून आता मोठ्या ताकदीने लोकसभेसाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी वर्गाचा त्यांना पाठिंबा वाढत चालला असून विविध तालुक्यांमध्ये त्यांच्या बैठकांना गर्दी होताना दिसत आहे.

एकंदरीतच सुळे, पवार विरुद्ध भागवत असा सामना रंगताना दिसत आहे. पारंपारिक निवडणुकांचा अनुभव असणाऱ्यांविरुद्ध ओबीसी पर्वाचे महेश भागवत यांनी मोर्चा उघडला असूनप्रस्थापितांविरोधात आपली लढाई असल्याचे ते सांगत आहेत. विविध तालुक्यांमध्ये प्रलंबित प्रश्नांकडे भागवत यांनी जनतेचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. सुळे आणि पवार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.