पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता सर्वप्रथम ‘सहकारनामा’ ने वर्तवली होती आता हे भाकीत खरं होताना दिसत आहे. आढळराव पाटलांना शिरूरमधून लढण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून देण्यात आली असल्याची माहिती आता समोर आली आहे. शिरूरमधून लोकसभेसाठी अजितदादा गटाकडून आढळराव पाटील हेच उमेदवार असू शकतात असे भाकीत ‘सहकारनामा’ ने मागे वर्तवले होते ते आज खऱ्यात उतरल्याचे दिसत आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात चाचपनी करून येथील आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळरावांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे समजत आहे. शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता आढळराव पाटील हे उमेदवार असल्याने मागील पराभवाचा वचपा ते यावेळी काढतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. गेल्या काही दिवसापासून शिरुर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराबाबत विविध तर्क लावले जात होते. यावेळी सहकारनामा ने येथे प्रदीप कंद यांच्याऐवजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली होती. महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेलेली आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
2019 साली शिरुर लोकसभा मतदार संघात आढळरावांविरोधात अमोल कोल्हे उभे ठाकले होते. यावेळी कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला होता. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्यात काटे की टक्कर होणार असून अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यासाठी आढळराव पाटलांना मोठी तयारी करावी लागणार आहे. अजितदादा यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा वापरली होती त्यामुळे या ठिकाणी कोल्हे यांच्याविरोधात अजितदादांकडून तगडा उमेदवार शोधला जात होता. अखेर अजितदादांनी कोल्हेंच्या विरोधात आढळरावांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान दिले आहे.