वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले मात्र आता याच निर्णयाला प्रकाश आंबेडकरांनी कडाडून विरोध केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील लोकसभा निवडणुका ह्या दोन टप्प्यांमध्ये घेण्याची मागणी केली असून महाराष्ट्र राज्यात ना बर्फ पडतो, ना हिंसा होते मग मतदानाचे पाच टप्पे कशासाठी? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.
राज्यात निवडणुकांचा इतिहास चांगला मग असे का
प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मी 1984 पासून निवडणूक लढवत आहे. मात्र या काळात मी आजपर्यंत निवडणूकीत कुठेही गडबड झालेली पाहिली नाही. कुठे दंगा नाही, राज्यात कुठे बर्फ पडत नाही की दळणवळणाची कुठे समस्या नाही मग राज्यातील दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचं कारण काय? निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, अशी मागणी करत प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे.
दोन टप्प्यातच निवडणुका झाल्या पाहिजेत
महाराष्ट्रात ना कुठे दळणवळणाची समस्या ना कुठे बर्फ पडतो ना कुठे मोठ्या प्रमाणावर पाऊस. मग राज्यात लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे का? हा शांत महाराष्ट्र आहे मात्र त्याला इलेक्शन कमिशन अशांत दाखवायला निघालं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे असं म्हटलं आहे.
असे आहेत राज्यातील मतदानाचे पाच टप्पे
1 ला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
2 रा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
3 रा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
4 था टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
5 वा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ