एसटी मध्ये सोन्याचे दागिने, पैसे चोरणाऱ्या सराईत ‘लेडी डॉन’ ला पकडले, 11 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त.. अनेक गुन्हे उघडकीस

इंदापूर : एस.टी. स्टँडवर बस मध्ये बसण्याच्या बहाण्याने गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रक्कम चोरी करणाऱ्या सराईत महिला आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि इंदापूर पोलिसांना यश आले आहे. या महिलेकडून २३५ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. ०२/०३/२०२४ रोजी फिर्यादी अलका वसंतराव बनकर, (वय ५९ वर्षे, रा. ताम्हाणेनगर, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर) या पुणे येथे जाण्याकरीता इंदापूर एस.टी. स्टॅंड येथून एस. टी. बस मध्ये बसून पुण्याकडे निघाल्या होत्या. एस. टी. बस मध्ये चढताना त्यांच्या बॅगेतील लहान पर्स कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली होती. त्यामध्ये साडे पंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. गुन्ह्याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यात आला. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील महिला आरोपी अश्विनी अवि भोसले (रा. माही जळगाव ता. कर्जत जि. अहमदनगर) हिने केले बाबत गुप्त माहिती मिळाली होती. सदर महिला आरोपींची माहिती मिळवून तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदरची महिला आरोपी ही कर्जत परीसरात आली असल्याची माहिती मिळाली. दि. ०७/०३ /२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व इंदापूर पोलीस स्टेशनकडील तपास पथकासह जावून सापळा रचण्यात आला. यानंतर रचून आरोपी अश्विनी अवि भोसले हिस ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तिने नमुद गुन्हा केल्याचे सांगितले असून तिला विश्वासात घेवून तिच्याकडे चौकशी करता, तिने केलेले १) खेड पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ९४९ / २०२४ भा.दं.वि. का. क. ३७९ व २) इंदापूर पो स्टे गु.र.नं. ६१०/२०२३ भा.दं.वि. का. क. ३७९ यांचेसह एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी अश्विनी अवि भोसले हिचेकडून नमुद गुन्ह्यातील चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी २३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ६४ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. महिला आरोपी अश्विनी अवि भोसले हिच्याविरोधात यापुर्वी जामखेड, करमाळा, हडपसर, पिंपरी पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, (बारामती विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती विभाग) बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोनि सुर्यकांत कोकणे, स्था.गु.शा. चे सपोनि योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, इंदापूर पो स्टे चे पोसई विवेकानंद राळेभात, स्थागुशाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहोवळे, राजू मोमीण,अतुल डेरे, निलेश शिंदे इंदापूर पोस्टे चे पोलीस अंमलदार प्रकाश माने, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, गणेश डेरे, निलेश केमदारने, महिला पोलीस अंमलदार रेश्मा जगताप, वंदना भोंग यांनी केली आहे.