राहुल अवचर
देऊळगाव राजे :
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली असून सध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा पिक जोमात आले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कांद्याला पोषक असे हवामान असल्यामुळे कांदा पिक मोठ्या तेजित आले आहे. मात्र कांद्याला यावर्षी चांगला दर मिळेल का अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील आलेगाव, खोरवडी, देऊळगावराजे, पेडगाव, वडगावदरेकर, शिरापूर, हिंगणी बेर्डी आदी गावांमध्ये मुख्य पीक म्हणून ऊस कांदा गहू मका सूर्यफुल आदी पिके तसेच तरकारीची पिके पण घेतली जातात. पण यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी आडसाली ऊस गेल्यानंतर खोडवा पीक न राखता कांदा आणि गहू च्या पिकाला पसंती दिली आहे.
गव्हाच्या पिकाबरोबरच कांदा पीकही जोमात आले आहे गेल्या काही वर्षांपूर्वी कांदा पिकाला अवकाळी चा फटका बसत होता त्यामुळे कांदा उत्पन्न मध्ये घट होत होती.
यावर्षी अजूनपर्यंत तरी अवकाळी पाऊस न झाल्यामुळे कांद्याला चांगले पोषक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे कांद्यावर रोगाचे प्रमाणही कमी आहे. डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात ज्या कांद्याच्या लागवडी झाल्या आहेत त्यांचे उत्पादन सुद्धा चांगले मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे.
यावर्षी कांद्याला जर काढणीच्या वेळेस चांगला भाव मिळाला तर शेतकरी साठवण न करता कांदा बाजारात विकतील. कांदा लागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मजुरांनाही कांदा लागवडीपासून कांदा काढेपर्यंत त्याच्या हाताला काम मिळनार आहे.
यावर्षी पाऊस कमी झाल्याने भीमा नदीला पाणी कमी पडेल असे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खोडवा पीक न राखता त्यामध्ये कांदा लागवड केलेली आहे. कांदा लागवडीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे मजुरीत सुद्धा वाढ झाली आहे त्यामुळे यावर्षी कांदा लागवडीमध्ये दरवर्षीपेक्षा 15000 रुपये एकरी जास्त लागत आहे त्यामुळे कांद्याला बाजार भाव योग्य मिळावा या आशेवर शेतकरी आहे.