दौंड : वाखारी जल जीवन मिशनसाठी विना परवाना सुरु असलेले खोदकाम त्वरीत थांबवावे. वाखारी येथील योजनेसाठी खोदकाम करण्याची परवानगी का घेतली नाही असा सवाल करणाऱ्या महिला वनरक्षकाला ठेकेदार आणि जेसीबी मालकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर प्रकार वरवंड हद्दीत घडला आहे. याबाबत शितल गंगाराम मेरगळ (वय 27 वर्ष रा. मेरगळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरवंड जलजीवन मिशन योजनेचे पाईपलाईन टाकण्यासाठीचे खोदकाम वनविभागाच्या हद्दीतून सुरु होते. यावेळी तेथे गस्त घालणाऱ्या वनरक्षक शितल मेरगळ ह्या गेल्या असता त्यांना एकाच चारितून दोन पाईपलाईन टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारले असता एक पाईपलाईन वरवंड तर दुसरी पाईपलाईन वाखारी गावासाठी असल्याचे सांगितले. त्यामुळे वरवंड गावच्या जल जीवन मिशन योजनेतील पाईपलाईन चारीसाठी खोदकाम करण्याची वनविभागाकडून परवानगी घेण्यात आली मात्र वाखारी जल जीवन मिशन योजनेसाठी खोदकाम करण्याची कोणतीही परवानगी वन विभागाकडून का घेण्यात आली नाही असे विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
त्यामुळे वनरक्षक शितल गंगाराम मेरगळ यांनी जे.सी.बी मशिन क्र. एम.एच.12 व्हि.एल. 5375 व ठेकेदार अमोल पोपटराव भोईटे (रा. पाटस) यांचे विरूध्द वन विभाग गु.र.नं. ओ.-2/2024 दिनाक 29/02/2024 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1) चे डी,एच व कलम 63 (क) नुसार गुन्हा नोंद केला. हा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर सदर जेसीबी हा वनविभाग कार्यालय दौंड येथे घेऊन जाण्यास त्यांनी सांगितले मात्र यातील अमोल पोपट भोईटे, ढमाले (पूर्ण नाव माहित नाही) ठेकेदार याचा भाचा या तिन्ही आरोपिंनी वनरक्षक महिला अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून हा जेसीबी तेथून घेऊन निघून गेले. या सर्व प्रकरणानंतर महिला वनरक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांवर सरकारी कामात अडथळा आणणे व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील आरोपी मजकुर यांनी वनरक्षक शीतल मेरगळ यांना तुम्ही मला पैसे मागितले असे तुमची खोटी तक्रार करतो व तुम्ही कसे एकटे फिरता मी तुम्हाला काहीही करू शकतो असा दम दिला. तसेच ठेकेदार अमोल भोईटे याने वनरक्षक फिर्यादी यांना धक्काबुक्की करून शिवागाळ केली व जे.सी.बी. मशिन त्या ठिकाणाहुन घेवुन गेले. घटनेचा अधिक तपास बी.सी.बंडगर (सहा.पो.उप निरीक्षक) हे करीत आहेत.