खुशाल लॉकडाउन करा! पण, अगोदर या लोकांना प्रत्येकी 5 हजार द्या : चंद्रकांतदादा पाटील



पुणे : सहकारनामा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्य सरकार लॉकडाउन करण्याच्या विचारात असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीतून जाणवू लागले आहे. 

मात्र या लॉकडाउन ला आता भाजपकडून विरोध होताना दिसत असून लॉकडाउन हा पर्याय नाही, एक वर्ष लोकं कसे जगले हे मातोश्रीमध्ये राहून समजणार नाही! अशी चपराक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा  पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावली आहे. 

लॉकडाउन झाल्यास लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे तुम्हाला समजणार नाही असे त्यांनी सांगताना पुरातन काळी राजा जसा कपडे बदलून वस्त्यांमध्ये फिरायचा तसं फिरावं लागेल, पण तुम्ही जर मुख्यमंत्री म्हणून फिरला तर तुमच्या सोबत जो लवाजमा असेल त्यामुळे लोक तुमच्याशी लोक खुलून बोलणार नाहीत या  शब्दात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील हे आज पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेट झाल्यानंतर त्यांनी  प्रसार माध्यमांसमोर बोलताना वरील विषयाबाबत आपले मत मांडले. 

लॉकडाउन झाल्यानंतर ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते हे तुम्हाला समजणार नाही असे म्हणत 1 कोटी गरीब लोकांना प्रत्येकी 5 हजार रुपये द्यावेत आणि खुशाल लॉकडाउन करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

लॉकडाउन बाबत बोलताना त्यांनी लॉकडाउन झाल्यानंतर कित्येक महिने लोकांना घरात बसावे लागले होते. 

आणि आता काही महिन्यामध्ये कुठे तरी परिस्थिती निवळून पूर्वपदावर येत होती मात्र आता पुन्हा लॉकडाउन करणे हे योग्य ठरणार नाही आणि तसे करायचेच असल्यास  राज्य सरकारने अगोदर हातावर पोट असलेल्या साधारण 1 कोटी लोकांना  प्रत्येकी पाच हजार द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.