दौंड : आपल्या कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देऊन त्याची जनजागृती करणारे, देव देवळात नसून माणसात आहे असे निर्भीडपणे सांगून समाजातील जातीय व्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घेणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील विविध पक्ष, संघटनांच्या वतीने गाडगेबाबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे तसेच दौंड चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगरपालिकेच्या उप- मुख्याअधिकारी सुप्रिया गुरव व मा. नगरसेवक, येथील पक्ष ,संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जयंतीनिमित्ताने पो. निरीक्षक चंद्रशेखर यादव, नागसेन धेंडे, इंद्रजीत जगदाळे यांनी आपल्या भाषणातून गाडगेबाबांच्या महान कार्याचा आढावा घेतला व सध्याच्या युवा पिढीने गाडगेबाबांचे विचार आत्मसात करावे असा मोलाचा सल्लाही यावेळी दिला.
संपूर्ण समाजाला ज्या गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्याच गाडगेबाबांच्या स्मारक परिसराची पावसाळ्यामध्ये दुरवस्था होते, स्मारकाला घाणीचा विळखा पडतो ही सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे गाडगेबाबांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम नव्याने सुरू करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला आहे.
यासाठी नगरपालिकेने आवश्यक असे सहकार्य करावे अशी मागणी परीट सेवा समितीच्या वतीने करण्यात आली. येथील उद्योजक प्रशांत पवार यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ, गाडगेबाबा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी लागणारा संपूर्ण खर्च स्वतः करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले याचे सर्व उपस्थित्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. दौंड शहर व तालुका परीट सेवा समितीच्या वतीने गाडगेबाबा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.