दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
शहर व परिसरामध्ये रोजच कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे, कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची कडकपणे अंमलबजावणी केली पाहिजे असे आवाहन दौंडचे परिविक्षाधीन पोलीस उप.अधीक्षक मयूर भुजबळ यांनी केले.
भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे आज पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते. यावेळी मयूर भुजबळ म्हणाले, शहरातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तरच कोरोना वर नियंत्रण मिळविता येईल. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण जिल्हा लॉकडाउनच्या दिशेने जात असल्याचे चित्र आहे.
स्वतःवर बेतल्या शिवाय कोरोनाची भयानकता लोकांना कळत नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणा बाबतही चुकीचा प्रचार होतो आहे, लस घेतली तरी कोरोना होतो याचाच जास्त प्रचार होत असल्याने लसीकरणाला प्रतिसाद नाही. प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे लस घेण्यामध्ये कोणताही तोटा नसून फायदाच होणार आहे असेही मयूर भुजबळ म्हणाले.
शहरातील परिस्थितीबाबत त्यांनी बोलताना शहरांमध्ये वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करणार आहे, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर तसेच विनापरवाना वाहने दामटणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगत वाढत्या कोरोनामुळे शहरात रात्री 8 ते सकाळी 7 वाजे पर्यंत जमावबंदी लागू आहे याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नमूद केले.
शहरात विना मास्क फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना 500 ते 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे तसेच हॉटेलमध्ये 50 टक्के क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
वाळू माफीया विषयी बोलताना त्यांनी तालुक्यातील भीमा नदी पात्रांमध्ये कोठेही अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच कारवाई केली जात आहे. कोणत्याही ठिकाणी वाळू माफिया वाळू उपसा करीत असल्यास दौंड पोलिसांना माहिती द्यावी कोणाचीही गय न करता कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.