दौंड मधील ‘कृषी प्रदर्शन’मध्ये महिलेचा विनयभंग, दोघांविरोधात गुन्हा दाखल..

अख्तर काझी

दौंड : दौंड -पाटस रोडवरील रामकृष्ण लॉन्स समोरील पटांगणामध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरोधात विनयभंगाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तोफिक रफिक काझी व शमशाद रफीक काझी (रा. सरपंच वस्ती, दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार दि. 19 फेब्रुवारी रोजी 4:15 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी महिला आपल्या पतीबरोबर रामकृष्ण लॉन्स कार्यालयासमोरील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आली होती. दरम्यान प्रदर्शन पहात असताना तौफिक काझी व त्यांची आई शमशाद काझी फिर्यादी यांच्या पती जवळ आले व त्यांच्याबरोबर असलेल्या जुन्या वादावरून त्यांनी भांडणे काढली. फिर्यादी यांच्या पायावर पाय ठेवून त्यांनी त्यांच्या डोळ्यावरील चष्मा काढला.

फिर्यादी यांनी त्यांना याचा जाब विचारला, व दुर्लक्ष करून फिर्यादी व पती पुढे जाऊ लागले. तेव्हा तोफिक याने फिर्यादी महिलेस अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली, फिर्यादी यांच्या अंगावरील बुरख्यामध्ये हात घालून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तोफिक यांच्या आई शमशाद यांनी फिर्यादी यांना मारहाण केली असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. कृषी प्रदर्शनामध्ये महिलेचा विनयभंग व मारहाणीची घटना झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आयोजकांनी प्रदर्शना ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे