दौंड : गेल्या कित्येक वर्षांपासून केडगाव गावातील मुस्लिम आळी, गायकवाड आळी येथील पालखी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटिकरणाचे काम रखडले होते. हे काम अखेर मार्गी लागले असून त्यामुळे येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. कुसुम चंद्रकांत गजरमल आणि त्यांचे पुत्र रोहीत गजरमल यांचा येथील रहिवाश्यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.
राजकीय कुरखोड्या आणि सत्ता बदल… केडगाव गावातील या रस्त्याचे काम काहींनी जाणूनबुजून रखडविल्याचा आरोप या अगोदर तेथील रहिवाश्यांकडून केला जात होता. मात्र फंड असूनही या रस्त्याचे काम केले गेले नाही त्यामुळे स्थानिकांच्या आरोपांना यामुळे पुष्टी मिळत होती. याच काळात ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका झाल्या आणि जनतेने सत्ता बदल केला.
सत्ता बदल आणि कामांना सुरुवात.. सत्ता बदल होताच तोंड पाहून कामे न करता सर्वांची सरसकट कामे करणार आणि विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे येथील पॅनल प्रमुख आणि सरपंचांनी आपल्या विजयी मिरवणूकीतील भाषणात जाहीर केले होते. त्यानुसार रखडलेली, न झालेली आणि जाणूनबुजून राखडवलेली कामे करण्याचा निर्धार नवनिर्वाचित सरपंच आणि त्यांच्या सदस्य सहकाऱ्यांनी घेतला असे सत्ताधारी प्रमुखांकडून सांगितले गेले. त्याचाच एक भाग म्हणून आता केडगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आलेल्या विविध फंडामधून विकासकामांना वेग देण्यात आला आहे. या विकासकामांमुळे केडगावचा कायापालट होताना दिसेल असा विश्वास येथील नागरिक व्यक्त करत आहेत.
वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली
गेल्या काही वर्षांपूर्वी तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी हा रस्ता होण्यासाठी त्यांच्या खालील कार्यकर्त्यांना आदेश देऊनही येथील रस्त्याचे काम मुद्दाम करण्यात आले नव्हते. त्यामुळे नेत्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे कार्यकर्ते शिरजोर झाल्याचा प्रकार येथे पहायला मिळत होता. आत्ताही या रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण केले जात होते. मात्र ग्रामपंचायत सदस्य गजरमल यांनी आक्रमक भूमिका घेताच या रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला आहे.