सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षेची मागणी

अख्तर काझी

दौंड : गावभाग (सांगली) येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम याचा निर्घृण खून करण्यात आला, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट महाराष्ट्रात घडली आहे. शासकीय तिजोरीवर नियंत्रण ठेवण्याचे काम माहिती अधिकार कार्यकर्ता करतात, त्यांनाच संपविले जात आहे त्यामुळे अशा घटनांवर अंकुश बसावा म्हणून या खुनातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी येथील ज्ञानमाता सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेच्या वतीने याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी श्वेता रायकर, राजेश बोर्डे, वैजयंती तैपरबील,शिवानी वांबीरे , चेतना सोनवणे आदी उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम हा दि. ७ फेब्रुवारी रोजी मित्रासोबत बाहेर जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. आणि त्याच रात्री कुरुंदवाड -नांदणी रस्त्यावर त्याचा निर्घृण पणे खून करण्यात आला.15 जुन 2005 सालापासून या देशात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याची अंमलबजावणी सुरू झाली. शासकीय कार्यालयात पारदर्शकता यावी, कार्यालय हे भ्रष्टाचार मुक्त व्हावे म्हणून नागरिक या कायद्याचा वापर करू लागले. हा कायदा देशात लागू होऊन 18 वर्ष पूर्ण झाले असून या काळामध्ये अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते मारले गेले आहेत, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रा मध्ये घडत आहे.

अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठे मोठे भ्रष्टाचार खुले करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी लुटण्यापासून वाचविला आहे. परंतु आज, हा निधी वाचविणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला प्रशासन वाचवीत नाही. संतोष कदम याचा खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी तसेच कदम यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये देण्यात यावे व राज्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना त्वरित संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.