BSSK – भीमा पाटस कारखाना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकडून नाव ठेवण्याशिवाय दुसरी अपेक्षाच नाही



दौंड : सहकारनामा

भीमा पाटस सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केले ? आतापर्यंत खासगीकरणाला कोणी प्रस्थान दिले व वेगवेगळ्या प्रकारे कारखाना कसा अडचणीत येईल हा दृष्टिकोन ठेवून कोणी काम  केले हे समजण्याइतकी दौंड तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. ज्यांनी कायमच कारखाना अडचणीत येईल व बंद पडेल असे प्रयत्न केले त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या प्रश्नांची अपेक्षा होती अशी टिका भीमा सहकारी साखर कारखान्याचे  उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे नाव न घेता केली.

यावेळी बोलताना बारवकर पुढे म्हणाले की, कारखान्याच्या आपल्या काळातील विनातारण 51 कोटी रुपयांची 90 कोटी रुपये परतफेड  कारखान्याने बँकेस केलेली आहे तरीही आज अखेर वीस कोटी बाकी दिसत आहे. बँक अडचणीत जाऊ नये म्हणून त्यावेळेस कारखाने बँकेच्या हितासाठी हा निर्णय घेतला होता.

काही कारखान्यांनी तर अशा विनातारण घेतलेल्या कर्जाची आजतागायत परतफेड केली नाही व त्या कर्जाची जबाबदारीही कारखान्यांनी घेतलेली नाही याला जबाबदार कोण? तसेच भीमा सहकारी साखर कारखाना अडचणीत असताना बँकेने कारखान्याच्या हितासाठी कोणता निर्णय घेतला व काय योगदान दिले याचा खुलासा जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी करावा असे आव्हान उपाध्यक्ष बारवकर यांनी केले.

 ज्या बँकेचे आपण अध्यक्ष आहात त्या बँकेचे व इतर बँकांचे किती कर्ज आहे? ते आपणास माहित आहे. त्यामुळे ती आकडेवारी आपण जाहीर करावी. चुकीची आकडेवारी सांगून सभासदाची व तालुक्यातील जनतेची दिशाभूल करू नये. 

 जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आपण 2017 – 18 व 2018- 2019 मध्ये कारखान्याला बँकेकडून कर्जाची उपलब्धता करून दिलेली नाही तसेच 2020- 21 साठी बँकेकडे कारखान्यांनी कर्ज मागणी प्रस्ताव दिल्यानंतर बँकेने त्यास नकार दिलेला आहे मग आत्ताच सहकाराविषयीचे आपले प्रेम का जागे झाले ?याचा खुलासा जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी करावा.

कारखाना केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीने बँकांचे एकरकमी कर्ज परतफेड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या कौशल्याने बँक ऑफ इंडियाचे 42 कोटी 93 लाख 75 हजार 773 या रकमेचे ओटीस मार्फत 8 कोटी 65 लाखामध्ये बँकेचे एकरकमी कर्ज परतफेड केलेली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारखान्याचा फायदा झाला आहे .आपणास भीमा सहकारी साखर कारखाना विषयी ईतकेच प्रेम असेल तर कारखाना सुरू करण्यास आपण अशा पद्धतीने मदत करणार आहात का याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा असा सवालही त्यांनी विचारला आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी कारखान्याच्या सन 2019 -20 मध्ये ऊस बिल ऍडव्हान्स दिसत असल्याचे सांगितले आहे मात्र ते बँकेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना जमा खर्च हा कसा असतो याची माहिती जास्त असावी मात्र त्यांच्या वक्तव्यातून ही माहिती त्यांना दिसत नसल्याचे जाणवत आहे . वसुस्थितीत सन 2018 -19 या गळीत हंगामामध्ये सभासदांचे उर्वरित पेमेंट सन 2019 -20 मध्ये दिलेले आहे त्यामुळे ते सन 2019- 20 च्या अहवालात बिल ऍडव्हान्स म्हणून दिसत आहे .एवढीच माहिती स्वतःला.    सहकारमहर्षी म्हणून घेणारे यांना माहित नसेल का? 

जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी ब्रह्मदेव आला तरी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना चार आकडी बाजार भाव देऊ शकत नाही असे वक्तव्य यापूर्वीच केले होते त्यानंतर कारखाना सुरळीत होऊन कारखान्याने  चार आकडी बाजारभाव दिलेला आहे .आजही जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांनी ब्रह्मदेव आला तरी कारखाना सुरू होऊ शकत नाही असे वक्तव्य केले आहे त्यावरूनच यांना कारखान्याविषयी किती आपुलकी आहे किंवा त्यांची भूमिका काय आहे हे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष हे कारखान्याची चौकशी करण्याबाबत वारंवार सांगत आहेत तर जेव्हापासून अध्यक्षांनी कारखान्याचे काम केले आहे तेव्हापासून आज पर्यंत त्यांच्या व आमच्या कालावधीतील व महाराष्ट्रातील त्यांच्या व आमच्या सर्वच पक्षांच्या कारखान्यांची  चौकशी करण्यास त्यांनी सांगावे. त्याचे आम्ही स्वागत करू असे उपाध्यक्ष बारवकर यांनी शेवटी सांगितले.