शिरूर मध्ये तीन गावठी पिस्टल सह नऊ काडतूसे जप्त, चार आरोपिंना अटक

शिरूर : शिरूरमध्ये गावठी पिस्तूलांची देवाणघेवाण करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी तीन पिस्टल आणि नऊ काडतूसे जप्त करण्यात आले आहेत.

दि. १०/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे पथक शिरूर परीसरात शिरूर पोलीसस्टेशन कडील दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी समांतर तपास करत असताना, पथकाला गोलेगाव (ता. शिरूर जि. पुणे) या गावाकडे जाणारे रोडवर पुणे ते अहमदनगर हायवे ब्रीज जवळ काळया रंगाच्या काचा असलेली एक लाल रंगाची स्विफ्ट कार पहाटेच्या वेळी येणार असून कार मधील इसम हे पिस्टल ची देवाण घेवाण करणार आहेत असल्याची माहिती मिळाली.

सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळारचून गोलेगाव गावाकडे जाणाऱ्या रोडलगत पुणे – अहमदनगर हायवे ब्रीज येथे आलेल्या एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारवर कारवाई केली. यावेळी कारमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार १) संकेत संतोष महामुनी (वय २४ वर्षे, रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) २) अभिषेक मिसाळ (वय २३ वर्षे, रा.सोनारआळी, शिरूर ता. शिरूर जि. पुणे) ३) शुभम दत्तात्रय दळवी (वय २७ वर्षे, रा. प्रितमप्रकाश नगर, शिरूरता. शिरूर जि. पुणे) ४) गणेश ऊर्फ श्रीरंग शंकर महाजन, (वय ३० वर्षे रा. गोलेगाव, ता. शिरूर जि. पुणे) हे मिळून आले. त्यांचेकडून तीन गावठी पिस्टल व नऊ जिवंत काडतूस मिळून आले आहेत.

सदर आरोपींवर अवैध अग्निशस्त्र बाळगणे व शरीराविरूद्धचे, मारामारीचे गुन्हे यापुर्वी दाखल असून यातील आरोपी संकेत संतोष महामुनी यास काही महीन्यापूर्वीच अवैध पिस्टल बाळगून विक्री केल्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून आठ पिस्टल हस्तगत केले होते. सदर आरोपी संकेत महामुनी याच्यावर ४ गुन्हे, आरोपी अभिषेक मिसाळ याच्यावर २ गुन्हे आरोपी शुभम दळवी याच्यावर ४ गुन्हे, आरोपी गणेश महाजन याच्यावर ६ गुन्हे असे यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपींना शिरूर न्यायालयात हजर केले असता, त्यांची दि. १३/०२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असून आरोपींनी अवैध पिस्टल कोठून आणले आहेत, कोणत्या कारणासाठी आणले आहेत याबाबत पुणे ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमूख (पुणे ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (पुणे विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डोले शिरूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, विक्रम तापकीर, संजय जाधव, योगेश नागरगोजे, चालक सहा.फौ. मुकुंद कदम चालक पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.