जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

जुन्नर : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची हानी झाली असल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारा संवेदनशील नेता हरपल्याची शोक भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

वल्लभ बेनके यांनी जुन्नर विधानसभेचे अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे त्यांचे पुत्र आहेत. माजी आमदार वल्लभ बेनके हे पवार कुटुंबियांचे अतिशय निकटवर्तीय समजले जायचे. वल्लभ बेनके हे आजारी असल्याने बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सोमवारी सायंकाळी चार वाजता हिवरे बुद्रुक(ता. जुन्नर ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वल्लभ बेनके यांनी जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा निवडणूक लढवली होती ज्यामध्ये चार वेळा ते निवडणूक आले होते.