बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी, मा. जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांसह कार्यकर्त्यांची मागणी

अख्तर काझी

दौंड : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिले असल्याची माहिती वीरधवल जगदाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी पक्षाचे अजय राऊत, जिवराज पवार यांसह मा. नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, काही दिवसातच आगामी लोकसभा निवडणूक होण्याचे संकेत मिळत आहे, या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मी माझे मत मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या भाजपा व शिवसेना( शिंदे गट) यांच्यासोबत राज्यामध्ये सत्तेत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा आपला( पक्षाचा) हक्काचा आहे व येथे सक्रिय कार्यकर्त्यांचा ही संच मोठा आहे.

या मतदारसंघातील उत्साह तसेच अजित पवार व कुटुंबाप्रती असलेले प्रेम व प्रत्येक कार्यकर्त्याचा जनसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही अतिशय सोईस्कर राहणार आहे. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांचाही या मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क आहे.

म्हणून असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, या मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाल्यास कार्यकर्त्यांची काम करण्याची इच्छाशक्ती द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपण केंद्रात आणि राज्यात देखील सत्तेत आहोत या सर्व गोष्टींचा फायदा या भागातील विकास कामांसाठी होणार आहे. या सर्वच बाबींचा विचार करता बारामती मतदार संघाच्या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा विचार व्हावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.