पुणे : सासवड (पुरंदर) येथील तहसीलमधून ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलीस पथकाने दोन आरोपिंना अटक केली असून यात अजून एक आरोपी निष्पन्न झाला आहे. भय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर, अजिंक्य राजू साळुंके (दोघे रा.माळशिरस ता. पुरंदर, पुणे) अशी या दोन आरोपींची नावे असून या ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. न्यूज एजन्सी आणि वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आल्याचे वृत्तात म्हटले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या EVM चोरी प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक केली असून तीन अधिकाऱ्यांला निलंबित करण्यात आलं आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले EVM मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरांना या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट सह अटक केली आहे.
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी असल्याने सोमवारी तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडल्याचे आढळून आले. येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आणि पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली. आरोपिंनी ईव्हीएम मशीन नेमके कशासाठी चोरले याचा तपास आता पोलीस करीत आहेत.