दौंड : आम्ही पोलीस स्टाफ आहोत.. आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे असे सांगून परप्रांतीयांना त्यांनी अडवले. मात्र आमची झडती इथे नको पोलीस ठाण्यात घ्या असे म्हणल्यावर त्यांना मारहाण करून मोबाईल व रोकड जबरीने घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला तर ठार करू असे धमकावणाऱ्या दोघांच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी, ‘दि.३ रोजी सकाळी १० वाजता दोन परप्रांतीय युवक दौंड रेल्वे स्थानकातून बस स्थानकाकडे जात असताना दोन इसमांनी मोटारसायकलवरून येऊन त्यांना अडवून पोलीस असल्याचे सांगून झडती घेऊन त्यांच्याजवळचा एक मोबाईल व रोकड असा अठरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. त्यांनंतर पोलिसांना कळवल्यास जीवे मारू अशी धमकी देत मारहाण केली.याबाबत घडलेल्या प्रकाराबाबत मुनहेन्द्रसिंग कोमलसिंग नरवारिया (रा.शिरूर,पुणे) याने दौंड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कारवाईच्या तात्काळ सूचना दिल्या. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून दि.६ रोजी दौंड शहरातून पानसरे वस्ती व वडार गल्ली येथून दोन इसमांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे अक्षय अशोक देवकर (रा.वडारगल्ली दौंड) व युवराज पांडुरंग बनकर (रा.पानसरेवस्ती दौंड) अशी आहेत. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात जबरदस्तीने चोरी केलेले साहित्य त्यांचेकडे असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड विभाग स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे, गुन्हेशोध पथकाचे पोलिस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.