डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक विटंबनेचा दौंडमध्ये निषेध, समाजकंटकांना कठोर शासनाची दलित संघटनांची मागणी

अख्तर काझी

दौंड : कर्नाटकातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची काही समाजकंटकांनी विटंबना केली, या संतापजनक घटनेचा येथील आंबेडकरी विचारांच्या पक्ष, संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. या घटनेतील जबाबदार समाजकंटकांना पोलीस प्रशासनाने कठोर शासन करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी भारत सरोदे, अनिल साळवे, अमोल सोनवणे, पांडुरंग गायकवाड , जालिंदर सोनवणे, श्रीकांत शिंदे, निखिल स्वामी, अ‍ॅड.अमोल काळे, फिरोज तांबोळी, शिवाजी सोनवणे, निलेश मजगर तसेच भीम अनुयायी उपस्थित होते.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटकातील कलबुर्गी येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाची काही मनुवादी प्रवृत्तीच्या इसमांनी विटंबना केली आहे. त्याचा सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. असे कृत्य केल्याने बाबासाहेबांचे विचार कधीच संपणार नाहीत, या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची गरज आहे. त्यामुळे स्मारकाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून, यामागे कोणती शक्ती आहे याचा पोलीस प्रशासनाने शोध घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.