केडगाव (दौंड) : देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दि.26 जानेवारी 2024 रोजी केडगाव (ता. दौंड) येथील विशेष ग्रामसभा मोठ्या खेळीमेळीत पार पडली. या ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पहायला मिळाले. यावेळी केडगावचे विभाजन होण्यापेक्षा केडगाव ही नगरपंचायत म्हणून तिला मान्यता मिळावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. केडगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर केडगाव नगरपंचायतीमध्ये करावे असा ठराव सूचक म्हणून पाराजी हंडाळ यांनी मांडला त्यास अनुमोदक म्हणून राहुल उर्फ बाळासो कापरे यांनी अनुमोदन दिले. ग्रामस्थांसमोर मांडण्यात आलेला हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे मांडायची पुरेपूर संधी देण्यात आल्याने नागरिक आनंदी दिसत होते.
तहकुब ग्रामसभेचा काळ अखेर संपला, नागरिकांचा मोठा प्रतिसाद.. मागील काही वर्षांपासून केडगावची ग्रामसभा नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तहकुब होत होती. नागरिक ग्रामसभेला का हजर राहत नाहीत याचे कोडे अनेकांना उलगडत नव्हते त्यामुळे आजच्या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र नवनियुक्त सरपंच सौ.पूनम गौरव बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाराजी हंडाळ, बाळासो कापरे, भगवानभाऊ गायकवाड यांसह इतर जेष्ठ ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली आजची ग्रामसभा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
प्रत्येक नागरिकाला आपली मागणी आणि म्हणणे मांडायची संधी
आज केडगाव ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला वार्डवाईज आपले म्हणणे मांडायची आणि कामांची मागणी करण्याची पुरेपूर संधी देण्यात येत असल्याची घोषणा बाळासो कापरे यांनी केली त्यामुळे प्रत्येक वार्डमधील नागरिकांनी उभे राहून आपल्या मागण्या आणि अडचणी सांगितल्या. यामध्ये सिमेंट रस्ते करणे, पाण्याची व्यवस्था करणे, लाईट आणि कचऱ्याच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. या समस्या, अडचणी ग्रामपंचायतचे कर्मचारी लिहून घेत होते त्यामुळे आता रखडलेली कामे मार्गी लागतील अशी कुजबुज नागरिक करताना दिसत होते.
रखडलेली कामे युद्धपातळीवर केली जाणार, ग्रामपंचायत समोरील सर्व अतिक्रमने काढणार
केडगाव ग्रामपंचायतच्या विविध वार्डमधील रखडलेली विकासकामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येतील तसेच जी नविन कामे सुचवली आहेत ती त्वरीत मंजूर करून पूर्ण केली जातील अशी माहिती सरपंच पुनम बारवकर यांनी यावेळी दिली. तर केडगाव ग्रामपंचायतच्या समोर रस्त्याच्या आजूबाजूला जी अतिक्रमणे करण्यात आली आहेत ती त्वरीत काढण्यात यावीत अशी मागणी नागरिकांनी केली त्यावेळी ही अतिक्रमणे लवकरच काढण्यात येतील असे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिले.