आज अजित पवारांच्या हस्ते उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उदघाटन, अखेर पुणे ग्रामिणमधून कारभाराला होणार सुरुवात

पुणे : काही वर्षांपासून पुणे शहर की पुणे ग्रामिण असा वाद सुरु असलेले उरुळी कांचन पोलीस ठाणे अखेर पुणे ग्रामिणमध्ये विलीन करण्यात आले असून आज शनिवार दि.20 जानेवारी 2024 रोजी सायं 4.00 वाजता उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा उदघाटन समारोह संपन्न होणार आहे.

हा उदघाटन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील, निलम गोऱ्हे, अमोल कोल्हे, अ‍ॅड. अशोक पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (कोल्हापूर परीक्षेत्र) पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार तसेच पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे पोलीस उपायुक्त आर. राजा, विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर पोलीस हद्दीचा विस्तार करण्यात येऊन यामध्ये लोणी काळभोर हे ग्रामिण भागातील पोलीस ठाणे पुणे शहरला जोडण्यात आले होते. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस ठाणे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंकित कार्यरत असल्याने आपसूकच पुणे शहरामध्ये सामिल झाले होते. मात्र उरुळी कांचन पोलीस ठाणे हे ग्रामिण हद्दीमध्येच असावे अशी नागरिकांची मागणी जोर पकडत होती. त्यातच वाढलेल्या विस्तारामुळे उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा बोजवारा शहर पोलिसांना पेलवला जात नसल्याची टिका होत होती त्यामुळे अखेर उरुळी कांचन हे स्वतंत्र पोलीस ठाणे करण्यात येऊन ते पुणे ग्रामीणला जोडले गेले आहे.