शालेय अल्पवयीन मुलींना प्रेमजालात अडकवून ‘अपहरणाच्या’ घटनांमध्ये वाढ, यवत पोलीस स्टेशन हद्दीतही प्रकरणे वाढल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या गावांतील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाद्वारे आकर्षित करून त्यांना खयाली दुनियाची स्वप्ने दाखवत त्यांचे अपहरण करून पळवून नेण्याचे प्रमाण वाढू लागले आहेत. दिवसेंदिवस अश्या घटनांमध्ये वाढ होत चालल्याने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. अल्पवयीन मुलींना मोहपाशात अडकवून त्यांचे अपहरण करून त्यांचे कौमार्य भंग करणाऱ्या आणि या मुलींच्या आयुष्याचे वाटोळे करणाऱ्यांवर आता पोलिस कोणती कठोर कारवाई करतात याकडे पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.

प्रेमाच्या मोहपाशात अडकवून अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्याचे प्रमाण वाढले..
देशात, राज्यात बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा दिला जात आहे. मात्र ह्या बेटी ज्यावेळी शाळेत शिकायला जातात त्यावेळी तिला आपल्या मोहपाशात अडकविण्यासाठी अनेक गिधाडे शाळेच्या आवारात टपून बसलेली दिसतात. मुली शाळेला आल्या की गाड्यांवर येऊन बोकड हेअर स्टाईल केलेली ही गिधाडे शाळेच्या आजूबाजूला चकरा मारून या मुलींना इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे मोबाईल नंबर किंवा त्यांच्या घरचे पत्ते शोधून त्या मुलीच्या घरी दुचाकीवरून चकरा मारण्याचे प्रकार सुरु होतात. अनेकवेळा मुलींना धमकावून, बळजबरीने प्रेमपाशात ओढले जाते. हे सर्व प्रकार सध्या केडगाव आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये सुरु असल्याचे काही घटनांतून पुढे येताना दिसत आहे.

नाईलाजाने शिक्षण पूर्ण होण्या आधीच लग्नाची घाई आपल्या मुलींना चांगले शिक्षण देण्याचे पालकवर्गाचे स्वप्न असते मात्र असल्या प्रकारांमुळे आता पालकवर्गाचे स्वप्न भंगू लागली आहेत. मुलगी कितीही हुशार असली आणि तीच्या मैत्रिणींमध्ये एक जरी असले प्रकरण घडले तर संपूर्ण पालकवर्ग तणावात आल्याचे दिसते आणि मग आपल्या मुलीचे करिअर होण्याअगोदरच तीचे वयाच्या 18-19 व्या वयातच लग्न लावून या भीतीतून मोकळे होण्याचा प्रयत्न पालक करताना दिसतात. त्यामुळे अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे कौमार्य हिसकाविणाऱ्या नराधमांवर पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर यातून काही भयंकर प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तक्रार द्यायला जाणाऱ्या पालकांना पोलिसांची अरेरावी, गावपुढाऱ्यांचा हस्तक्षेप की आणखी काही.. अचानक आपल्या अल्पवयीन मुलीसोबत असे काही घडले की पालकांची अवस्था ही भांबावल्यासारखी होते. फिर्याद देऊ, मुलीला शोधू की इज्जत वाचवू याच्यामध्ये पालक गुरफटला जातो. यातच धाडस करून तो पोलीस ठाण्यात गेला की तेथील पोलीस कर्मचारी त्यास अरेरावी, दमदाटी करून त्याची सरळ फिर्याद घेण्याऐवजी त्यालाच कायद्याचे ज्ञान शिकवू लागतात. आणि आम्हाला तुमच्या सांगण्यावरून संशईताचे नाव तक्रारीत घेता येणार नाही असे म्हणून त्याचा धीर खचवला जातो. हे प्रकार सध्या इकडेही होत असल्याने पालकांची अवस्था मात्र आत्महत्येच्या विचारापर्यंत जाऊन ठेपते. अश्या प्रकरणांमध्ये काही गावपुढारी आतून हस्तक्षेप करताना दिसतात आणि काही पोलीस कर्मचारी त्यांचे ऐकून ही प्रकरणे जास्त मनावर न घेता फक्त दिवस ढकलत ठेवण्याचे काम करतात त्यामुळे अश्या भयंकर प्रकरणांमध्ये आता पोलीस आणि पुढारी यांचेही फोन कॉल डिटेल्स आणि सीडीआर शासनाने काढण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला कुठेतरी आळा बसेल अशी चर्चा पालकवार्गातून होत आहे.

काही पोलिसांना का आहे पत्रकारांची अ‍ॅलर्जी !

अनेकवेळा तक्रार द्यायला गेलेल्या पालकांना पोलीस कर्मचाऱ्यांकडून दमदाटी, अरेरावी करण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. अचानक दुःख कोसळलेल्या पित्याने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर तुम्ही कुणालाही सांगा पण पत्रकारांना सांगू नका असा फर्मान सोडला जातो ही आपबीती खुद्द एका पित्याने पत्रकारांना सांगितली आहे. पत्रकारांना ही प्रकरणे समजली तर पोलिसांचा यात नेमका काय तोटा होईल हे त्यांनाच माहित मात्र पोलिसांची पत्रकारांबाबत असलेली भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे हे काही प्रकारणांवरून स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे यापुढे पोलीस-पत्रकार यांच्यात विश्वासाची दरी वाढून वाद उत्पन्न होण्याची आणि कुरखोड्या केल्या जाण्याची शक्यता वाढली आहे.