मटका अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षकांचा छापा, साडे आठ लाखांच्या साहित्यासह 25 जण ताब्यात

सुधीर गोखले

सांगली : जिल्ह्यातील मिरज शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या सुभाषनगर जवळील हुळळे प्लॉट येथे सुरु असलेल्या मटका अड्डयावर काल रात्री पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखऱ यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. या छाप्यात रोख रकमेसह तब्बल आठ लाख त्रेचाळीस हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले मुख्य मटका चालक रामदास सुरेश भगत(वय ४८, रा सुभाषनगर) याच्या सह २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांकडून एक लाख पंचावन हजारांची रोकड,  एक लाख तीस हजार किमतीचे २७ मोबाईल,  पाच लाख अठ्ठावीस हजाराच्या सोळा दुचाकी, दोन हजार किमतीचे कॅल्क्युलेटर, चार कलर प्रिंटर असा एकत्रित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. गेले कित्तेक वर्षांपासून राजरोसपणे सुरु असलेल्या या मटका अड्डयाची चर्चा मिरज पूर्व भागात सुरु होती. टाकळी गावच्या हद्दीत हुळळे प्लॉट मध्ये एका बंगल्यामध्ये हा अड्डा सुरु होता. याआधीही मटका बुकी भगत याच्यावर कारवाई झाली होती मात्र त्यानंतरही त्याने मटका अड्डा सुरूच ठेवल्याने कोणाच्या वरद हस्ताने मुख्य मटका बुकी भगत हा राजरोस हा अड्डा चालवत होता?  अशी चर्चा या भागात दबक्या आवाजात सुरु आहे.  

अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाई नंतर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.