मुंबई : मुंबईतील बडे नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. ते आजच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मिलिंद देवरा काँग्रेस सोडून एकनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ आधीच वर्तवली जात होती. मात्र, एक दिवसापूर्वीच त्यांनी या अफवा असल्याचे सांगत नकार दिला होता.
माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या जुन्या ट्वीटर आणि नव्या ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, माझ्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुढे लिहिताना त्यांनी, “माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले 55 वर्ष जुने नाते संपुष्टात आले असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतुट पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा आभारी आहे.” असेही म्हटले आहे.
मिलिंद देवरा आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीतच पक्षात प्रवेश करणार आहेत.
यापूर्वी शनिवारी मिलिंद यांनी काँग्रेस सोडण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याच्या वृत्ताला त्यांनी अफवा असल्याचे म्हटले होते. नुकतीच काँग्रेस कार्यकारिणी जाहीर झाली तेव्हा मल्लिकार्जुन खर्गे यांनी मिलिंद देवरा यांच्याकडे संयुक्त कोषाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती, मात्र त्यानंतर अवघ्या 20 दिवसांनी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.